देवी पूजन
ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मातेची मूर्ती. लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेली ही देवी नवसाला पावणारी, हाकेला धावणारी,
लोकांच्या आयुष्यातील विघ्ने दूर करणारी म्हणून ओळखली जाते. ह्या मूर्तीच्या चेहेर्यावरील विलक्षण तेज, सोज्वळ भाव, आश्वासक हास्य आणि तिचे रुप ह्या गोष्टी सर्वांच्याच मनात ठसा उमटवून जातात.
ह्या मूर्तीचे (मूर्ती तयार करण्यापासुन, मंडपात आसनस्थ होऊन ते विसर्जनापर्यंत) पावित्र्य राखण्यासाठी विशिष्ट नियमावली आखण्यात आली असुन त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
गौरी पुजनाच्या दिवशी मुहूर्त पाहून देवीच्या मूर्तीसाठी आणलेल्या शाडूच्या मातीची आणि पाटाची पूजा केली जाते. त्यानंतर मुर्तीकाराचीही पुजा केली जाते. ह्या पूजेनंतर मग मूर्ती घडवण्याच्या शुभकार्यास प्रारंभ होतो.
टेंभी नाक्यावर ज्या पवित्र जागी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते त्या विशिष्ट भूमीची देखील पुजा केली जाते. त्याला भूमीपुजन किंवा मंडप मुहूर्त असे म्हणतात. हे अनंत चर्तुदशीला करण्याची प्रथा आहे.
कारण भूमीचा मालक ‘ वसू ’ म्हणजे विष्णू असतो आणि अनंत चर्तुदशी हा त्याचा मुख्य दिवस असतो. घटस्थापनेच्या दिवशी देवीची विधीवत पूजा मुर्तिकाराच्या इथे केली जाते. योग्य मुहूर्तावर मग देवीला
आमंत्रित केले जाऊन मग वाजत गाजत तिला मंडपात आसनस्थ होण्यासाठी मिरवणूक काढून आणले जाते.
मंडपात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दारात कुमारीकांकडून तिचे पूजन केले जाते. मग ठरलेल्या मुहूर्तावर मंडपात ती स्थापित केली जाऊन तिची प्राणप्रतिष्ठा व विधीवत पूजा होते. पुढे मग नवरात्रौत्सवाच्या काळात
देवीची रोज षोड़षोपचारे पूजा केली जाते. याकाळात दुर्गासप्तर्षी पाठ होतात. पंचमी, अष्टमी अशा महत्वाच्या दिवशी तिची विशेषत्वाने पूजा केली जाते. या नऊ दिवसात प्रत्येक तिथीच्या वेगवेगळ्या रुपाप्रमाणे
देवीची शास्त्रोक्तपध्दतीने पूजा होते. देवीवर प्रतिदिन श्रीसुक्त म्हणून अभिषेक केला जातो. दिवसातून तीन वेळा आरती होते.
विजयादशमीच्या दिवशी सर्व भक्तांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी “लोककल्याण” नावाचा होम आवर्जून केला जातो.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शांतीपाठ केला जातो. या उत्सवाच्या काळात एखादी
चुकीची गोष्ट अनावधानाने घडली तर मातेने ती चूक पोटात घ्यावी आणि सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी असा उद्देश या पाठीमागे असतो. त्यानंतर महानैवेद्य दाखवून भंडारा केला जातो.
कॉपीराइट © २०११ श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था, भवानी चौक,
टेंभी नाका, ठाणे, नवरात्री उत्सव.सर्वाधिकार सुरक्षित.
Powered by Neologic Software Solutions