उत्सवाचा प्रवास
ठाण्यातील टेंभी नाका येथे साजर्या होणार्या नवरात्रोत्सवाची महती ठाणे शहरापुरती मर्यादित राहिलेली नसून महाराष्ट्राच्या विविध भागातुन भक्तगण हजारो श्रध्दाळू येथे येत असतात आणि मातेच्या दर्शनाने धन्य होतात.
अर्थात यामागे ४२ वर्षाची तपश्चर्या आहे आणि मातेच्या आशिर्वादा बरोबर भक्तांच्या सदिच्छा ही आहेत.
नवरात्रोत्सवाच्या आजपर्यंतच्या वाटचाली विषयी.
१९७८ साली ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतक
एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होउन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचे प्रबोधन व्हावे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून
ह्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
प्रारंभी अगदी छोटया प्रमाणात या उत्सवास सुरवात झाली. देवीची मुर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करणे, मंडपाची सजावट, परिसर स्वच्छता इ. सर्व कामे करण्यात स्थानिक रहिवासी व
कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत. खरतर या लोकांच्या सहकार्यानेच हा उत्सव उभा राहिला. प्रारंभी देवीची मुर्ती देखील छोटी होती. पण पुढे काळाच्या ओघात उत्सव लोकप्रिय होत गेला, भक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ
होत गेली आणि मग उत्सवाचे स्वरुप ही भव्यदिव्य होत गेले.
१९८०-८१ च्या काळात उत्सवाचे रुपांतर श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था, ई.(६३८) अशा नोंदणीकृत संस्थेत झाले.
मा. धर्मवीर श्रीमंत श्री. आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव आयोजित होऊ लागला.
ह्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सवाच्या काळात देवीची होणारी षोड़षोपचारे पूजा, दुर्गासप्तर्षी पाठ, नऊ दिवसात प्रत्येक तिथीच्या वेगवेगळ्या रुपाप्रमाणे देवीची होणारी पूजा, विजयादशमीच्या दिवशी होणारा
लोककल्याण होम ह्या सर्वगोष्टी विधीवत आणि शास्त्रोक्त रीतेने केल्या जातात.
ही देवी नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी हिची ख्याती असल्यामुळे हजारो भाविक देवीची ऒटी भरण्यास, नवस बोलण्यास व फेडण्यास येतात.
आज या उत्सवाला अतिभव्य असे महालक्ष्मी जत्रेचे स्वरुप आले आहे. जवळपास ७०० ते ८०० लहान मोठे विक्रेते या जत्रेत येउन आपली उपजिवीका करतात.
ह्या नवरात्रोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंचमीला खेळला जाणारा महाभोंडला. हा भोंडला पारंपारिक पध्दतेने पूर्वपार चालत आलेली गाणी म्हणूनच खेळला जातो.
प्रारंभीच्या काळात इथे गरबा देखील पारंपारिक पध्दतेने खेळला जायचा. पण वेळेचे बंधन आल्यामुळे गरबा नृत्य खेळले जात नाही. खरेतर दरवर्षी भक्तांच्या संख्येत वृध्दी होत गेली आणि त्यामुळे ही गरबा नृत्य खेळणे काहिसे अशक्य होत गेले.
ह्या नऊ दिवसांच्या काळात भजनांचे कार्यक्रम ही आयोजित केले जातात.
हया नवरात्रोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे “ देवीची मिरवणूक ”. देवीच्या आगमनाची मिरवणूक कळवा परिसरातून निघते. पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात, लेझिमच्या तालावर, सुशोभित केलेल्या
आकर्षक रथात अंबामातेच्या मुर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघते. पारंपारिक मैदानी खेळ, आदिवासी लोकनृत्य, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ आणि फटाक्यांची आतिषबाजी असा स्वरुपाची नयनरम्य
मिरवणूक पाहण्यास दुतर्फा गर्दी होते. ठाण्यातील टेंभी नाका येथे मिरवणूक येईपर्यंत चौकाचौकात रंगेबेरंगी रांगोळ्या काढलेल्या असतात. देवीची विसर्जन मिरवणूक देखील अशा प्रकारची भव्यदिव्यच असते.
देवीचा विसर्जन मिरवणूक रथ मनमोहक अशा विद्युत रोषणाईने सजवलेला असतो. ही मिरवणूक देखील एक सुंदर अनुभव असतो.
जनसामान्याप्रमाणे मा.श्री.बाळासाहेब ठाकरे व कै.सौ.मीनाताई ठाकरे हे नित्यनियमाने येत असत. तिच परंपरा मा.श्री.उध्दव ठाकरे, मा.सौ.रश्मी ठाकरे, मा.श्री.राज ठाकरे, मा.सौ.शर्मिला ठाकरे
यांनी सुरु ठेवली आहे. त्याचप्रमाणे मा.श्री.मनोहर जोशी, मा.श्री.व सौ.नारायण राणे, मा.श्री.गणेश नाईक, मा.श्री.गोपिनाथ मुंडे, मा.श्री.लालकृष्ण अडवाणी, मा.श्री.छगन भुजबळ, मा.श्री.वसंत डावखरे,
मा.श्री.गोविंदराव आदिक, मा.श्री.नकुल पाटील इ. विविध राजकिय पक्षांचे नेते यांनी आजपर्यंत या उत्सवास भेट दिली आहे. तसेच थोर साहित्यीक व इतिहासकार मा.श्री.बाबासाहेब पुरंदरे,
जोतिष्यभास्कर मा.श्री.जयंत साळगावकर, श्रीमंत दगडूशेट हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री.प्रतापराव गोडसे यांनी देखील या उत्सवास भेट दिली आहे......