ठाणे शहर
ठाणे शहर म्हणजे कला, क्रिडा, शिक्षण, साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे एक सांस्कृतिक शहर. ऐतिहासिक काळापासुन स्वतःचा ठसा उमटवणारे महाराष्ट्रातले एक प्रमुख शहर. ऐतिहासिक काळात “ श्री स्थानक ” म्हणून प्रसिध्दी प्राप्त केलेले शहर. मंदिराचे गाव आणि तलावांचे गाव म्हणूनही प्रसिध्दी पावलेले होते. परंपरा जोपासताना काळानुरुप बदल करत जाणारे असे हे ठाणे शहर ! येऊरची हिरवीगार वनश्री, ठाण्याची खाडी यामुळे ठाण्याचे सौंदर्य अधिकच खुलले. आधुनिक काळात ठाणे शहर चोहोबाजुंनी वाढत असताना जणु काही कात टाकत आहे. उड्डाणपूल, उंच गगनचुंबी इमारती, भव्य गृहनिर्माण प्रकल्प, चकचकीत मॉल यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलू पाहत आहे.
पण कुठेतरी गतकाळाशी आपली नाळ जोडलेली असते तेव्हा ठाण्याच्या गतकाळाविषयी....
ठाणे शहराची वैशिष्ट्ये तरी किती सांगावित १५३८ मधील नोंदीनुसार ठाणे शहरात ६० तलाव आणि ६० देवळे होती. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर व त्यातील नंदी हे तर ठाण्याचे भूषणच आहे. ठाण्यात मराठी भाषेतील ग्रंथाचा संग्रह करणारे महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय १८९३ मध्ये स्थापन झाले. १६ एप्रिल १८५३ रोजी तत्कालीन व्हिक्टोरीया टर्मिनल ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली होती. ठाण्यातील सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च मधील घंटा ही देशातील मोठ्या घंटापैकी एक मानली जाते. ठाण्यातील गडकरी रंगायतन हे नाट्यगृह
आशिया खंडातील प्रसिध्द नाट्यगृहांपैकी एक म्हणून ऒळखले जाते.
ठाण्याला नावलौकिक प्राप्त करुन देण्यात येथील कलाकार, खेळाडू, विविध क्षेत्रातील थोर व्यक्ती, विचारवंत यांचे मोलाचे योगदान आहे. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रिडा-संकुल,
ठाणे कला भवन आणि मा. धर्मवीर श्रीमंत श्री. आनंद दिघे साहेब यांचा टेंभी नाक्यावरील सुप्रसिध्द नवरात्रोत्सव यांनी ठाण्याच्या नावलौकिकात अधिकच भर पाडली आहे.
कॉपीराइट © २०११ श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था, भवानी चौक,
टेंभी नाका, ठाणे, नवरात्री उत्सव.सर्वाधिकार सुरक्षित.
Powered by Neologic Software Solutions